रयतेचा राजा शिवछत्रपती निबंध
रयत सुखी, तर राजा सुखी
'रयत सुखी, तर राजा सुखी' हे शिवाजीराजांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे, तर बहुजनांच्या—रयतेच्या कल्याणासाठी आहे, ही त्यांची भावना त्यांच्या अनेक आज्ञापत्रांतून व्यक्त झालेली आहे. म्हणूनच त्यांचे वर्णन इतिहासकारांनी 'रयतेचा राजा' असे केलेले आहे.
मोगल, आदिलशाही, सिद्दी, फिरंगी, पोर्तुगीज अशा अनेक परकीय, स्वकीय शत्रूंशी संघर्ष करत शिवाजी महाराज स्वराज्य उभारत होते. अशा परिस्थितीत स्वराज्याच्या प्रदेशावर शत्रूच्या वारंवार मोहिमा होत. अशा मोहिमांमध्ये सर्वात जास्त संकट गावच्या रयतांवर कोसळे आणि त्यांचे सर्व जीवनच उद्ध्वस्त होऊन जाई.
शिवकाळातील एक पाटील अशाच एका शत्रूच्या धाडीबद्दल म्हणतो,
'साल गुदस्ता मोगल गावावरी धावणी करून गाव मारिला, वस्तूभाव, मालमत्ता, गुरेढोरे तमाम गावाचा बंद धरून नगरास आणला. माणसे दलदले व बाइला व लेकरे ऐसी सेदीडसे बंदी राहिली. कित्येक बंदीखाणी मेली.'
शिवकाळात अशा शत्रूच्या धाडीच्या व त्यांच्या अत्याचाराच्या घटना अपवादात्मक नव्हत्या. तो काळच 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असा होता.
अशा परिस्थितीत शत्रूचा मुलूख जिंकून स्वराज्यात सामील करीत असतानाच महाराज स्वराज्याच्या मुलखातील रयतेच्या संरक्षणाची डोळ्यात तेल घालून तजवीज करीत असत, असे दिसून येते. महाराज याबाबतीत किती जागरूक असत, त्याचे एक उदाहरण पाहण्यासारखे आहे.
मोगली सैन्याच्या धाडीपासून रयतेचे संरक्षण
इ.स. १६६२ मध्ये मावळ प्रदेशातील रोहिडेश्वर खोऱ्यात मोगली सैन्याची धाड येणार ही बातमी महाराजांना समजताच त्या खोऱ्याच्या सर्जेराव देशमुखास लिहिलेल्या पत्रात ते त्यास ताकीद देताना म्हणतात,
'मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात (खोऱ्यात) धावणीस येताती म्हणौन जासुदांनी समाचार आणिला तरी तुम्हांस रोख अहडताच (हे आज्ञापत्र पोहोचताच) तुम्ही तमाम आपले तपियात गावच्या गाव ताकदी करून माणसे, लेकरे, बाळे समवेत तमाम रयती लोकास घाटाखाले बाया जागा असेल तेथे पाठविणे. जेथे गनिमाचा आजार (त्रास) पहुचेन ऐशा जागीयासी त्यासी पाठविणे. ये कामास हैगै न करणे लिहिल्याप्रमाणे अंमल करणे.
ऐसिमासी तुम्हापासून अंतर पडलियावरही मोगल जो बंद (मनुष्ये) धरून नेतील. त्याचे पाप तुमच्या माथा बेसेल, ऐसे समजौन गावचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकांची माणसे घाटाखाले जागा असेल तेथे पाठविणे. या कामास एका घडीचा ही दिरंग न करणे.'
परचक्रापासून आपल्या रयतेचे रक्षण झाले पाहिजे, यासाठी महाराज किती जागरूक असत याची प्रचिती या पत्रावरून चांगल्या प्रकारे ध्यानात येते.
स्वकीय सैन्याकडूनही रयतेला त्रास होऊ नये
रयतेला केवळ शत्रूच्या सैन्यातल्या धाडीचाच धोका असे, असे नाही तर आपल्याही सैन्यातील लोकांकडून प्रजेस नाहक त्रास होण्याची शक्यता असे. हे जाणून महाराज आपल्या सैन्यातील लोकांकडून प्रजेस काडीचाही त्रास होता कामा नये, म्हणून किती दक्ष असत याचा दाखला त्यांनी सन १६७३ साली चिपळूण येथील छावणीकडे पाठविलेल्या या आज्ञापत्रात पाहावयास मिळतो.
या आज्ञापत्रात महाराज सैनिकांना व अधिकाऱ्यांना ताकीद देतात,
'विलायतीस (प्रदेशात) तसवीस देऊ लागाल, ऐशास लोक जातील. कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील. कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले ऐसे (तुम्ही) करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत. तेही जाऊ लागतील, कितेक उपाशी मराया लागतील.
म्हणजे त्याला ऐसी होईल, की मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल, तेव्हा रयतेची व घोडियाची सारी बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावखलक हो, जे गाव राहिले असाल त्यानी (तेथील) रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही.'
आपल्या सैन्यातील लोकांनी आपल्याच रयतेस त्रास द्यायला सुरुवात केली तर मग 'मोगलाहून अधिक तुम्ही' अशी रयतेची भावना होईल आणि मग याला 'स्वराज्य' म्हणता येणार नाही.
स्वराज्यात रयतेचे पालनपोषण झाले पाहिजे, ही रयतेच्या कल्याणाची महाराजांची उच्चतर भावना या पत्रात प्रतीत झाली आहे.
रयतेवर जुलूम होता कामा नये
कोणत्याही परिस्थितीत रयतेवर जुलूम होता कामा नये, म्हणून शिवाजी महाराजांनी लष्करात ताकीद दिली होती. तशी मुलकी अधिकाऱ्यांनाही समज दिली होती.
सन १६७६ साली कोकणातील प्रभावली मामल्याच्या रामजी अनंत या सुभेदारास धाडलेल्या आज्ञापत्रात महाराज म्हणतात,
'चोरी न करावी, इमाने इतबारे साहेब काम करावे येसी क्रियाच (शपथ) केली आहेस. तेणेप्रमाणे, येक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास व दुरुस वर्तणे, या उपरी कमावीस कारभारास लावणी संचणी उगवणी जैसी जैसी जे जे वेलेस जे करू ते ते करीत जाणे.
हर भातेने (तन्हेने) साहेबाचा वतू अधिक होय, ते करीत जाणे. मुलकात बटाईचा तह चालत आहे. परंतु रयतेवरील जाल (जुलूम) न पडता रयतेचा वाटा रयतेस पावे आणि राजभाग आपणांस येई ते करणे. रयतेवरी काडीचे जाल वगैरे केलिया साहेब तुजवर राजी नाहीत वैसे बरे समजणे.'
येथेही आज्ञापत्रात महाराजांनी स्वराज्यातील गरीब रयतेच्या कल्याणाविषयीची तळमळ अकृत्रिम शब्दांत प्रकट झालेली आहे.
स्वदेशी मालाला प्रोत्साहन
तसेच परदेशातून येणाऱ्या मालाच्या स्पर्धेत स्वदेशी माल रयतेला खरेदी करणे अधिक सोयीचे व्हावे, याकरिता परदेशी मालावर आपल्या अधिकाऱ्यांना एवढा जकात कर आकारण्यास सुचवत की तो स्वदेशी मालापेक्षा अधिक महाग ठरेल, जेणेकरून रयत परदेशी माल खरेदी करण्याच्या खटपटीस पडत नसत.
उदा. बागदेशाच्या मीठावर आपल्या सुभेदारावर जकात कर आकारण्यास सुचविले, जेणेकरून स्वदेशी मीठ अधिक विकले गेले जाईल.
प्रशासनातील रयतेच्या हिताची दूरदृष्टी
प्रशासनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वराज्याच्या रयतेच्या हिताची दूरदृष्टी शिवाजी महाराजांची उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे आर्थिक प्रशासनामध्येसुद्धा त्यांनी त्या काळात एवढा मूलगामी विचार केला होता.
हे पाहून त्यांच्या एकूण कल्याणकारी प्रशासनासंबंधी आजही अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच त्यांना द्रष्टा महापुरुष असे म्हटले जाते.
शिवाजी महाराजांचा आदर्श
शिवाजी महाराज राजे असूनही त्यांच्या राज्यकारभारातील रयतेच्या कल्याणाची भावना आजही महत्त्वाची आहे. आज लोकशाहीच्या राज्यात राज्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असा आग्रह धरला जातो.
रयतेचे सुख, सुरक्षितता आणि कल्याण यांनाच राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी ठेवणारे शिवाजी महाराज म्हणूनच इतिहासात 'रयतेचा राजा' म्हणून अजरामर झाले आहेत.
No comments:
Post a Comment